बहुजननामा ऑनलाइन टीम – पाकिस्तानच्या एका दहशतवाद विरोधी न्यायालयाने मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड (Pakistani mastermind Hafiz Saeed)आणि जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईदला दहशतवाद फंडिंगच्या आणखी दोन प्रकरणांत गुरुवारी दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. त्याला मागच्या फेब्रुवारीमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या दोन प्रकरणात 11 वर्षाची शिक्षा सुनावली होती.
कोर्टाच्या एका अधिकार्याने सांगितले, लाहोरच्या दशहतवादविरोधी न्यायालयाने (एटीसी) आणखी दोन प्रकरणात सईदसह चार लोकांना शिक्षा सुनावली आहे. सईदचे दोन जवळचे साथीदार जफर इकबाल आणि याहया मुजाहिदला साडेदहा-साडेदहा वर्षांची शिक्षा देण्यात आली. तर सईदचा नातेवाईक अब्दुल रहमान मक्कीला सहा महिन्यांचा करावास सुनावला आहे. अधिकार्यानुसार, एटीसीचे जज अरशद हुसैन यांनी दोन्ही प्रकरणांच्या सुनावणीनंतर आपला निर्णय सुनावला. न्यायालयाने दहा हजार रूपयांचा दंड लावण्यासह सईदची संपत्ती जप्त करण्याचा आदेश सुद्धा दिला आहे.
41 प्रकरणे नोंदवली गेली
पाकिस्तानच्या दहशदवादविरोधी विभागाने सईद आणि जमात-उद-दावाच्या विरोधात एकुण 41 प्रकरणे नोंदवली होती. यापैकी 24 मध्ये निर्णय आला आहे. तर अन्य प्रकरणे एटीसीमध्ये प्रलंबित आहेत. सईदच्या विरोधात आतापर्यंत एकुण चार प्रकरणात निर्णय झाला आहे. त्यास दहशतवादी फंडिंगच्या प्रकरणात मागील वर्षी 17 जुलैला अटक केली होती. तो यावेळी लाहोरच्या लखपत कारागृहात उच्च संरक्षणात बंद आहे.
हाफिज सईदच्या प्रवक्त्याला 32 वर्षांची शिक्षा
यापूर्वी पाकस्तानच्या दहशतवादविरोधी कोर्टाने हाफिज सईदच्या प्रवक्त्याला 32 वर्षाची शिक्षा सुनावली होती. जमात-उद-दावा प्रवक्ता याहा मुजाहिद होता. ही शिक्षा टेरर फंडिंग प्रकरणात झाली आहे. कोर्टाने जमात-उद-दावाशी संबंधीत अन्य दोन लोकांना सुद्धा शिक्षा सुनावली होती. यामध्ये हाफिजचा पुतण्या प्रोफेसर हाफिज अब्दुल रहमान मक्की सुद्धा सहभागी होता. त्यास एक वर्षाची शिक्षा सुनावली होती.
हाफिज सईदच्या नेतृत्वात मुंबईत 2008 च्या हल्ल्याचा कट पाकिस्तानमध्ये रचला गेला. या हल्ल्यात 10 दहशतवाद्यांनी मुंबईत 6 अमेरिकन नागरिकांसह 166 लोकांची हत्या केली होती आणि शेकडो लोक जखमी झाले होते. यानंतर हाफिज सईदला संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेद्वारे जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आले होते. त्याच्यावर 10 मिलियन डॉलर (सुमारे 74 कोटी रुपये) चे बक्षीस ठेवण्यात आले. हाफिज सईदला मागच्या वर्षी जुलैमध्ये अंतरराष्ट्रीय दबावासह टेरर फंडिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. पाकिस्तान अॅक्शन टास्क फोर्सच्या दबावात ही कारवाई केली आहे.
यापूर्वी एटीसी लाहोरने पंजाब पोलिसांद्वारे नोंदवण्यात आलेल्या दहशतवाद आर्थिक पोषणाच्या आणखी दोन प्रकरणात जमात-उद-दावाचा जफर इक्बाल, हाफिज अब्दुल रहमान मक्की आणि मुहम्मद अशरफ यांना दोषी ठरवले होते. दोघांना दशहतवादविरोधी कायद्याच्या कलमांखाली 16 वर्षांची सामुहिक कारावासाची शिक्षा देण्यात आली होती.