नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानी क्रिकेटपटू अष्टपैलू खेळाडू शादाब खानवर एका तरुणीने गंभीर आरोप केले आहेत. ही मुलगी दुबईची असून तिचे नाव अशरीना साफिया असे आहे. आपल्याला फसवल्याचा आरोप या तरुणीने शादाबवर केला आहे. या तरुणीने सोशल मीडियावर एक स्टेटमेंट जारी केले आहे ज्यात शादाबने फसवल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही तर याचा पुरावा म्हणून या तरुणीने शादाब सोबत केलेले चॅट्स देखील सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. त्यामुळे याची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.
क्रिकेटपटू शादाब गोत्यात
दुबईत राहणाऱ्या अशरीनानं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टेटमेंट जाहीर केले. त्यात तिनं शादाबनं कशी तिच्यासोबत मैत्री केली आणि त्यानंतर त्याचं प्रेमात रुपांतर करून कसा गैरफायदा घेतला हेही सांगितलं आहे. शादाबनं पाकिस्तान संघाकडून 5 कसोटी, 43 वन डे आणि 40 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. हे प्रकरण अंगाशी येत असल्याचे दिसताच शादाबनं त्या मुलीला तिचे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या दोघांमधील संबंध जगजाहीर केल्यास शादाब माझे न्यूड फोटो व्हायरल करेल, असं त्या मुलीचं म्हणणं आहे.
काय आहे सोशल मीडियावरील पोस्ट
अशरीनानं लिहीलं की,”शादाबशी माझी मैत्री मार्च 2019मध्ये झाली. लंडन येथे झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान आम्ही खूपच जवळ आलो होतो. त्याची सोबत मिळावी म्हणून विविध देशांत प्रवास करण्यासाठी जवळपास 15000 डॉलर खर्च केले. मला त्याच्यावर पूर्णपणे विश्वास होता. पण, पाकिस्तानच्या एका पत्रकारानं आमच्या संबंधावर बातमी केल्यानंतर शादाबनं मला धमकी दिली. त्यानं आमचे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.” अशा आशयाची पोस्ट तिने सोशल मीडियावर लिहिली आहे.
याआधी पाकिस्तानचा सलामीवीर इमाम उल हक याच्यावरही असेच आरोप झाले होते. इमामने अनेक मुलींसोबत केलेली चॅटींग सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यात अनेकींनी इमामवर फसवल्याचा आरोप केला होता. आता शादाबही असाच एका प्रकरणात अडकला आहे.