पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – आळंदी येथून पारनेरला जाण्यासाठी टेम्पोत बसलेल्या २९ वर्षीय महिलेवर क्लिनर ने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. टेम्पो चालकाने रात्रभर टेम्पो पिंपरी परिसरात फिरवून पीडित महिलेस महामार्गावर सोडून दिले. हि घटना मंगळवारी रात्री ११ ते बुधवारी सकाळी ४ दरम्यान घडली.
या प्रकरणी पीडित महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर पोलिसांनी आयशर टेम्पो चालक आणि क्लिनर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; मंगळवारी रात्री आकराच्या सुमारास पीडित महिला आळंदी येथे वाहनाची वाट पाहत उभी होती. त्यावेळी त्या ठिकाणी आयशर टेम्पो आला. टेम्पोतील क्लिनर ने त्या महिलेस पारनेर येथे सोडतो असे सांगून आत बसवले. टेम्पो आळंदीतुन बाहेर पडला.
टेम्पो चालकाने टेम्पो पारनेरच्या दिशेने न नेता पिंपरी चिंचवड परिसरात आणला. रात्रभर टेम्पो पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या परिसरात फिरवला. दरम्यानच्या काळात क्लिनरने पीडित महिलेवर बलात्कार केला. बुधवारी पहाटे चारच्या सुमारास पीडित महिलेस शहरातील महामार्गावर सोडून टेम्पो चालक आणि क्लिनर फरार झाले. पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार केली असून आळंदी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.