नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने आपल्या ग्राहकांना दिलासा दिल्यानंतर देशातील आणखी एका बँकेने आपल्या ग्राहकांना दिलासा दिला आहे. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सने आपल्या व्याजदरात कपात केली आहे. मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिग रेटमध्ये बँकेने ०. १० टक्क्याची कपात केली असून गुरुवारी म्हणजेच उद्या हे दर लागू होणार आहेत. MCLR कमी झाल्याने सामान्य ग्राहकांना याचा फार मोठा फायदा होणार आहे. यामुळे ग्राहकांच्या कर्जाच्या व्याजामध्ये कपात होणार आहे आणि त्यामुळे गृहकर्जाच्या हप्त्यांवर देखील याचा फरक पडणार आहे. काल म्हणजेच मंगळवारी एसबीआयने आपल्या व्याजदरात ०. ५ टक्क्यांची कपात केली होती. भारतीय रिजर्व बँक म्हणजेच आरबीआयने फेब्रुवारी महिन्यात आपल्या रेपो रेट मध्ये ०. ७५ टक्क्यांची कपात केली होती. त्यानंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी विश्वास व्यक्त केला होता कि, कमी झालेल्या दराचा फायदा लवकरच बँका आपल्या ग्राहकांना देतील.
इतके स्वस्त झाले कर्ज
शेयर बाजारला दिलेल्या माहितीमध्ये बँकेने सांगितले कि, एक दिवस किंवा एका महिन्याच्या अवधीसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जामध्ये घट होऊन आता अनुक्रमे ८.२० आणि ८.२५ टक्के झाले आहे. यापूर्वी ते ८.३० आणि ८.३५ होते. त्याचप्रमाणे तीन महिने, सहा महिने आणि एका वर्षासाठीच्या व्याजदरात देखील कपात करण्यात आली असून आता ते अनुक्रमे ८.४५, ८.५५ आणि ८.६५ इतके झाले आहे.
MCLR म्हणजे काय
MCLR म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट. यामध्ये बँक आपल्या गुंतवणुकीनुसार व्याजदरांची रचना करत असते. हे बेंचमार्क दर असतात. या दरांमध्ये वाढ झाली कि, तुमच्या कर्जाच्या व्याजदरांवर देखील याचा परिणाम दिसून येतो.