कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८व्या जयंतीनिमित्त शहरातील १२८ लोकांना संविधान पुस्तिकेचे वाटप करण्यात येणार असून .विविध संस्था, संघटना व पक्षांच्या वतीने उद्या, रविवारी व्याख्यान, प्रबोधनपर मिरवणूक अशा सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सिद्धार्थनगर येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने सकाळी ध्वजारोहण, बाबासाहेबांच्या पुष्पहार अर्पण, बुद्धवंदना आणि विविध क्षेत्रांतील खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कोल्हापूरशी ऋणानुबंध’ या विषयावर व्याख्यान होईल.जयंतीनिमित्त राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने सायंकाळी साडेपाच वाजता शाहू स्मारक भवनात प्रा.गोपाळ गुरू यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : एक आधुनिक कैवारी’ या विषयावर ते विवेचन करणार असून अध्यक्षस्थानी प्राचार्य दिनकर खाबडे असतील. ‘फुले-शाहू-आंबेडकर फोरम’तर्फे मनीषानगर येथे सकाळी दहा वाजता शोभा रोकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.त्यानंतर डॉ. आंबेडकरप्रणित भारतीय लोकशाहीचे भवितव्य’ या विषयावर डॉ. प्रकाश पवार यांचे तर डॉ. रवींद्र ठाकूर यांचे ‘जोतीराव फुले यांच्या सामाजिक क्रांतीचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान होईल.सह्याद्री इतिहास संशोधन केंद्र, श्री शिवाजी मराठा फौंडेशन व सह्याद्री शिलेदार सेवा प्रतिष्ठानतर्फे सकाळी अकरा वाजता तुपाची विहीर, पावनगड येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. जयंती उत्सव कोल्हापूर शहर मध्यवर्ती समितीच्या वतीने सकाळी ११ वाजता बिंदू चौकात जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्या उपस्थितीत बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.