यवतमाळ: बहुजननामा ऑनलाईन – सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे, कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १६ ते २३ फेब्रुवारीपर्यंत छत्रपती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
१६ फेब्रुवारीला महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयात विदर्भस्तरीय वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. १७ फेब्रुवारीला छत्रपती महोत्सवाचे रितसर उद्घाटन होणार आहे. यावेळी उद्घाटक माजी मंत्री संजय देशमुख असतील. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप महाले, स्वागताध्यक्ष बिपीन चौधरी राहणार आहे. महोत्सवात ‘शिवरायांची कृषीनीती व शेतकऱ्यांची आजची अवस्था’ या विषयावर पत्रकार प्रकाश पोहरे तसेच ‘शिवरायांच्या स्वप्नातील भारत व वास्तविकता’ या विषयावर अॅड. वैशाली डोळस यांचे व्याख्यान होणार आहे.
महोत्सवाच्या निमित्ताने शिवकाव्य स्पर्धा, शिव निबंध स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, शिवरत्न संगीत सम्राट स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा असे दिमाखदार आयोजन करण्यात आले आहे. शिवाय रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, गरजूंना कपडे, औषधी, फळवाटप अशी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा कार्यक्रम या महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.