नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुलगी असलेल्या आई-वडिलांना मुलीच्या लग्नासाठी पैसे जमवण्याची खूपच चिंता असते. प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असतं की, मुलीचं लग्न धुमधडाक्यात लग्न व्हावं. पंरतु लाखो रुपये जमा करणं हे खूपच अवघड काम असतं. त्यामुळे आज आपण अशा योजनेबद्दल जाणून घेणार आहोत ज्यात तुम्ही तुमच्या मुलीसाठी गुंतवणूक करू शकता. तुमची मुलगी लग्नाच्या आधीच करोडपती बनू शकते. यासाठी तुम्हाला तुमच्या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी अकाऊंट उघडावं लागेल.
हे खातं तुम्ही जवळच्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडू शकता. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला टॅक्समध्ये सूटही मिळेल. सुकन्या समृद्धी अकाऊंटमध्ये तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने 14 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता. जेव्हा तुमची मुलगी 21 वर्षांची होते तेव्हा हे अकाऊंट मॅच्युअर होतं. यानंतर या खात्यात जमा केलेल्या रकमेवर मुलीच्या लग्नापर्यंत व्याजही मिळत रहातं.
समजा तुम्ही तुमच्या 1 वर्षाच्या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी अकाऊंट उघडून त्यात 14 वर्षांपर्यंत दरमहिना 12,500 रुपये गुंतवत असाल तर तत्कालीन व्याजानुसार, तुमची मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतर अकाऊंटमध्ये एकूण 77,99,280 रुपये जमा होतील. जर वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत मुलीचं लग्न झालं नाही तर या रकमेवर व्याजही मिळत राहतं. 25 व्या वर्षी मुलीच्या खात्यात 1 कोटींहून अधिक रक्कम जमा होते. तुम्ही 14 वर्षात या योजनेत एकूण 21 लाख रुपये गुंतवता. तुमच्या मुलीला एक कोटींहून अधिक रक्कम मिळते. सध्या सुकन्या समृद्धी स्कीममध्ये वर्षाला 8.5 टक्के व्याज दिलं जात आहे. या स्कीममध्ये कोणताही व्यक्ती एका वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख गुंतवू शकतो. तुम्ही तुमच्या 1 वर्ष ते 10 वर्षांच्या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी अकाऊंट उघडू शकता.