गांधीनगर : वृत्तसंस्था – गुजरातमध्ये आता लग्न समारंभ आयोजित करण्याअगोदर शासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे़ तसा आदेश गुजरात सरकारच्या आरोग्य विभागाने काढला आहे.
लग्न समारंभासाठी केवळ १०० जणांना परवानगी देण्यात येणार आहे. लग्न समारंभ आयोजित करणाºया यजमानांनी गुजरात सरकारच्या वेबसाईटवर अर्ज करुन ऑनलाईन परवानगी घ्यावी. त्यांची प्रत समारंभादरम्यान जवळ बाळगावी. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने लग्न समारंभाच्या वेळी मागितल्यास परवानगीचे पत्र दाखवावे, असे या आदेशात म्हटले आहे.
कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुजरातमधील बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असल्याने गुजरात सरकारने रात्रीच्या संचारबंदीसह विविध उपाय योजना केल्या आहेत. त्यातील पुढचे पाऊल म्हणून हा आदेश काढला आहे.
गुजरात राज्यात सध्या १३ हजार ६२७ कोरोना बाधित रुग्ण सक्रीय आहेत. राज्यात आतापर्यंत २ लाख ७ हजार ३७० जण कोरोना बाधित बरे झाले आहेत. आतापर्यंत ४ हजार १४५ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.