बहुजननामा ऑनलाईन टीम : झारखंड विधानसभा निवडणुकीला ३० नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून आज निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात खळबळजनक घटना घडली. गुमला जिल्ह्यातील सिसई येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या मतदारांवर दगडफेक करण्यात आली. यावेळी वातावरण जास्त पेटल्याने पोलिसांनी कारवाईसाठी केलेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. घटनेनेनंतर केंद्रावरील निवडणूक कर्मचाऱ्यांनी पळ काढल्याने पोलिसांनी ईव्हीएम ताब्यात घेतले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांना मतदान न करण्याची जबरदस्ती करण्यात येत होती. यानंतर जमावाने दगडफेक करण्यास सुरुवात केली. दरम्यान, निवडणूक आयोगाने या प्रकरणी अहवाल मागविला आहे.संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी मतदान केंद्राच्या आसपासचा परिसर सील केला असून सीआरपीएफची तुकडी गावामध्ये रवाना करण्यात आली आहे. यावेळी नागरिकांनी पत्रकारावरही हल्ला केला असल्याची माहिती मिळाली आहे.
यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही जण जखमी झाले असून यापैकी एका गंभीर जखमीला उपचारासाठी रांचीला हलविण्यात आले आहे. त्यात पोलिसांनी झाडलेली गोळी लागल्याने जिलानी नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. गुमलाचे पोलिस प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदारांकडून मतदान केंद्रावर दगडफेक करण्यात आली होती, त्याच्यावर पोलिसांनी गोळीबारही केला आहे. मतदारांना रोखण्यात येत असल्याचा आरोप करत सुरक्षा पथकावर दगडफेक करण्यात आली. यामुळे पोलिसांनी हवेत गोळीबार केला. या घटनेमुळे मतदान अधिकारी दुसऱ्या खोलीत लपले आहेत. या ठिकाणी दगडफेक सुरूच असून तणावाचे वातवरण आहे. हॉस्पिटलमध्येही मोठ्या संख्येने लोक पोहोचले आहेत.
Visit : bahujannama.com