नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेत आहेत. पीएम मोदींनी 27 जुलैरोजी ही बैठक बोलावली आहे, या बैठकीत कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर चर्चा होऊ शकते. बैठकीला गृहमंत्री अमित शाह सुद्धा उपस्थित असतील. याशिवाय केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन सिंह बैठकीत सहभागी होतील. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत राज्यांचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवसुद्धा सहभागी होणार आहेत. अनलॉक 2.0 हा 31 जुलैरोजी समाप्त होत आहे.
देशात कोरोना व्हायरसच्या संसर्गाची स्थिती भयावह होत चालली आहे. शुक्रवारी सायंकाळी कोरोना संक्रमितांचा आकडा 13 लाखांच्या पुढे गेला तर मृतांचा आकडा वाढून 31000 च्या जवळ पोहचला आहे. आतापर्यंतच्या रिपोर्टनुसार देशात संक्रमितांची एकुण संख्या 13,12,551 आहे तर 30,821 लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 8,31,059 लोक बरे झाले आहेत.
देशात मागील दोन दिवसात एक लाखांपेक्षा जास्त संसर्गाची प्रकरणे समोर आली आहेत. यापूर्वी तीन दिवसात एक लाखांपेक्षा प्रकरणे समोर आली होती. यापूर्वी बुधवारी संक्रमितांची संख्या 12 लाखांच्या पुढे गेली होती.
राज्यांमध्ये कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने अनेक राज्यांनी पुन्हा लॉकडाऊन करण्यास सुरूवात केली आहे. उत्तर प्रदेश सरकारने आठवड्यातून दोन वेळा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय पश्चिम बंगाल सरकारने कोलकातामध्ये 3 दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन केला आहे.
तर मणिपूरमध्ये 14 दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता स्थानिक प्रशासनेसुद्धा आपल्या स्तरावर शहरे बंद करत आहेत. यामध्ये विविध राज्यांच्या शहरांचा सहभाग आहे.