मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनामुळे वाहतूक व्यवसायाला बसलेला आर्थिक फटका आणि वाहतूक व्यवसायाशी संबंधित वर्गाचा आवाज सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी मनसेने हॉर्न ओके प्लिज आंदोलनाची हाक दिली आहे. ‘वाहतूक व्यवसायातील सर्वांचा आक्रोश बहिर्या राज्य सरकारच्या कानावर जावा, झोपेचे सोंग घेतलेले राज्य सरकार खडबडून जाग व्हावे यासाठी शुक्रवार 12 जूनला संध्याकाळी 5 वाजता सर्वांनी फक्त एक मिनिट हॉर्न वाजवावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक शाखेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी केले आहे.
आंदोलनामध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभागी करुन घेण्यासंदर्भातील मेसेज व्हायरल केले जात आहे. ‘फक्त एक मिनिट हॉर्न वाजवा आंदोलन हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वाहतूक सेना आणि आपली स्वतःची लढवय्या ओळख दाखवणारे आंदोलन आहे. आपण आज आणि उद्याची दिवस-रात्र एक करा. आपल्या विभागातील मनसेच्या सर्व महिला पुरुष, पदाधिकार्यांना व महाराष्ट्र सैनिकांना तसंच वाहनचालक – मालकांना भेटा. आंदोलनाबाबत त्यांना सविस्तर माहिती द्या. त्या सर्वांना आपल्याआपल्या विभागात असतील त्या ठिकाणी फक्त एक मिनिट हॉर्न वाजविण्याची विनंती करा,’ असे व्हायरल मेसेजमध्ये म्हटले आहे. याचप्रमाणे हॉर्न वाजवण्याच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक मनसे पदाधिकार्याने त्या ठिकाणावरून स्वतः व इतरांनाही फेसबुक लाईव्ह करायला सांगा असंही मनसे वाहतूक सेनेमार्फत सांगण्यात आलं आहे.