उमरखेड : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवत सत्ता स्थापन केलेल्या मोदी सरकारचा शपथविधीही पार पडला असला तरी त्यांच्याविरोधात बोलणाऱ्या लोकांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदीविरोधात संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षाने फेसबुकवर टाकलेल्या आक्षेपार्ह व्यंगचित्रामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जनभावना दुखावल्याबद्दल जिल्हाध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान ,फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह व्यंगचित्र प्रसारित करणाऱ्या संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गुणवंत सूर्यवंशी यांनी १३ जून रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास आक्षेपार्ह व्यंगचित्र प्रसारित केले. या प्रसारित केलेल्या व्यंगचित्रामुळे जनभावना दुखावल्याची तक्रार भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष लक्ष्मीकांत मैड यांनी रात्री ११ वाजताच्या सुमारास पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून गुणवंत सूर्यवंशीविरूद्ध भादंवि कलम २९५, ५०१ तसेच आय टी अॅक्ट ६७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अधिकचा तपास पोलीस करीत आहे.