Non-Cash Payments | ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर कॅशलेस पेमेंटमध्ये मोठी वाढ, 6 वर्षात 20.4% वरून वाढून झाले 58.1 टक्के

नवी दिल्ली : Non-Cash Payments | भारतात मागील सहा वर्षात ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर कॅशलेस पेमेंटने मोठी उसळी घेतली आहे. २०१८ मध्ये ते २०.४ टक्के होते आणि २०२४ मध्ये वाढून ५८.१ टक्के झाले आहे. आकड्यांचे विश्लेषण करणारी कंपनी ग्लोबल डेटाने एका रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे.

रोख पेमेंटशिवाय पेमेंटच्या इतर पर्यायात यूपीआय, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचा समावेश आहे. रिपोर्टमध्ये सविस्तर सांगितले आहे की, वैकल्पिक पेमेंटमधील वाढीस मोबाईल वॉलेटचा जास्त वापर जबाबदार आहे. हे युपीआयद्वारे संचालित होते आणि क्यूआर कोड स्कॅन करून रियल टाइममध्ये मोबाईल पेमेंट करण्याची सुविधा देते.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, आशिया-प्रशांत क्षेत्रात मोबाईल आणि डिजिटल वॉलेट सारख्या पेमेंट प्लॅटफॉर्मनी रोख आणि बँक ट्रान्सफरच्या पारंपरिक पद्धतींना पूर्णपणे बदलून टाकले. अशाप्रकारे वैकल्पिक पेमेंट प्लॅटफॉर्म चीन आणि भारतासारख्या देशांमध्ये लोकप्रिय आहे आणि आशिया-प्रशांत क्षेत्रातील बाजारात सुद्धा लोकप्रियता मिळवत आहेत.