अमरावती : बहुजननामा ऑनलाईन – येथील भामकर कोविड हॉस्पिटलमध्ये (परतवाडा, जि. अमरावती) रुग्णाकडून अधिक पैसे घेतले जातात. मात्र, पैसे घेवून त्यांना पक्के बिल न देता कच्चे बिल दिले जाते. हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णांकडून आर्थिक लूट होत आहे, असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. यावरून नातेवाईकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली की भामकर हॉस्पिटलकडून लूट झाली आहे. सोबतच अनेक रुग्णांची त्या हॉस्पिटलकडून लूट होत आहे, असा आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. मात्र, भामकर हॉस्पिटलने या प्रकरणावर सारवासारव करत ऐनवेळी बिल मागितल्याने कागदावरच बिल दिल्याचे डॉ. हेमंत चिमोटे यांनी सांगितले.
दरम्यान, रामदास आवारे (पांढरी, जि. अमरावती) यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांना १६ मे रोजी परतवाडा येथील भामकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ज्यावेळी दाखल केले त्यावेळी रुग्णाचा HRCT स्कॅन स्कोर १२ होता. मात्र ४ दिवसाच्या उपचारानंतर रुग्णाचा स्कोर १९ एवढा वाढला. त्यामुळे भामकर हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित उपचार होत नसल्याचा आरोप रुग्णांची मुलगी रुपाली आवारे यांनी केला. रुपाली यांनी त्यांच्या वडिलांना अमरावती येथील PDMC रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्याचे ठरविले मात्र त्यावेळी भामकर हॉस्पिटलने ५७ हजार रुपये बिल जमा करण्यास सांगितले. यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांना कोणत्याही प्रकारचे बिल न देता साध्या वहीच्या कागदार हिशेब लिहून दिल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढायला लागल्याने रुग्णांची तारांबळ उडू नये वेळीच उपचार मिळावा यासाठी खाजगी कोविड रुग्णालयास परवानगी देण्यात आली. काही खाजगी रुग्णालय रुग्णांवर व्यवस्थित उपचार करतात. मात्र काही रुग्णालयात मात्र रुग्णांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जाते. कॅश ने बिल घेणे, कमी रक्कमेची बिल देणे असे प्रकार जिल्ह्यात सर्रास घडत आहे, यामुळे रुग्णांची मात्र लूट होत आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामुळे आता रुग्णांची लूट करणाऱ्या खाजगी रुग्णालयावर जिल्हाधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.