पुणे : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात अनेक मोठ्या शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यामध्ये पुणे आघाडीवर आहे. तर लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यावर एक भाष्य केले आहे. तर सध्या शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत ४ हजार ९०० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातच आता रोज वाढणारे रुग्ण आणि बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या सारखेच येऊ लागल्याने रुग्णांना उपचारांसाठी खाटा उपलब्ध होण्याचे प्रमाण देखील वाढणार आहे. त्यामुळे पुणे शहरात लगेचच लॉकडाउन करण्याची गरज भासणार नाही. असे मोहोळ यांनी म्हटले आहे.
महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार खासगी हॉस्पिटलमधील ८० टक्के खाटा नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व मिळून जवळपास ५ हजार खाटा ताब्यात आहेत. खासगी रुग्णालयांकडून या खाटा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ऑक्सिजनसज्ज आणि व्हेंटिलेटर असणाऱ्या खाटा अशा आणखी २५०० खाटा वाढविण्यात येत असून, लवकरच खाटांचा आकडा ७ हजारांच्या घरात पोहचणार आहे. असे ते म्हणाले, तर मध्यम लक्षणे असणाऱ्या रुग्णांना १० दिवसांत घरी सोडण्याचे आदेशही खासगी रुग्णालयांना देण्यात आले असून, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांची हॉस्पिटलनिहाय नेमणूक करण्यात आलीय. रोज वाढणाऱ्या रुग्णांमधील १० टक्के रुग्णांना रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याची गरज भासते. त्याच वेळी १० टक्के रुग्ण बरे होऊन घरी जाणार आहेत. हा समन्वय व्यवस्थित साधला गेल्यास आणि अतिरिक्त खाटांचा ‘बफर’ म्हणून वापर झाल्यास रुग्णांवर उपचार होणे सहज शक्य होणार असल्याचेही महापौर मोहोळ यांनी म्हटले आहे.
महापौर मोहोळ म्हणाले, पुणे महानगरपालिका प्रशासनाने केलेले उपचार व्यवस्थेचे केलेले नियोजन; तसेच नागरिकांना कोरोनाप्रतिबंधक लस देण्यासाठी सुरू केलेली मोहीम पाहता त्याचा अपेक्षित परिणाम साधला जाणार आहे. नागरिकांनी सुरक्षिततेचे नियम पाळल्यास भविष्यात पुणे शहरात लॉकडाउन करण्याची गरज भासणार नाही.
लॉकडाउनचा फटका सर्वांना बसणार असल्याने पुणेकरांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. या दरम्यान, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता महापौरांनी महापालिकेत तातडीची आढावा बैठक घेतली. महापालिका आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.