नवी दिल्लीः वृत्त संस्था – अवघा देश कोरोना संकटाचा सामना करत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर AIIMS अन् ICMR यांनी प्लाझ्मा थेरपीसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटवली आहे. याबाबत एम्स आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन जारी केली आहे. कोरोनाबाबत ICMR आणि नॅशनल टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. प्लाझ्मा पद्धत विद्यमान मार्गदर्शक तत्त्वे अन् पुरावा यावर आधारित नाही. देशभरातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सध्या सुरू असलेल्या संशोधनात हे स्पष्ट झाले आहे की कोरोना रुग्णांना प्लाझ्मा थेरपीचा काही उपयोग नाही. असे असूनही तर्कहीनपणे उपयोग केला जात आहे. त्यामुुळे बैठकीत प्लाझ्मा थेरपी कोरोना उपचार पद्धतीतून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
ICMR चे वैज्ञानिक डॉ. समीरन पांडा म्हणाले की, एका आकडेवारीतून प्लाझ्मा थेरपीचा कोणताही फायदा नसल्याचे समोर आले. प्लाझ्मा थेरपी महागडी आहे. तसेच यामुळे भीती देखील निर्माण झाली आहे. दात्याच्या प्लाझ्माच्या गुणवत्तेची हमी दिली जात नाही. प्लाझ्मा अँटीबॉडी पुरेशा संख्येने असणे आवश्यक आहे, परंतु हे निश्चित नसते. यापूर्वी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सुरुवातीच्या मध्यम रोगाच्या अवस्थेत म्हणजेच लक्षणे दिसल्यापासून 7 दिवसांच्या आत हाय डोनर प्लाझ्माची उपलब्धता झाली, तर प्लाझ्मा थेरपीच्या ऑफ लेबल वापरास परवानगी दिली होती. काही डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांना पत्र लिहून ती काढून टाकण्याची मागणी केली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. प्लाझ्मा थेरपीचा तर्कहीन आणि अवैज्ञानिक उपयोग केला जात असल्याचा त्यांनी इशारा दिला होता. आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव आणि एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनाही हे पत्र पाठविण्यात आले.