अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – देशात १ जूनपासून हॉलमार्क असलेलेच सोन्याचे दागिने विकण्याबाबतच्या नियमाची अंमलबजावणी होणार आहे. मात्र महाराष्ट्रातील सराफांनी हॉलमार्क सेंटरची कमतरता असल्यामुळे ही मुदत वर्षभरासाठी वाढवावी अशी मागणी केली आहे. यासंदर्भात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली होती, त्यानुसार सराफांच्या मागणीवर योग्य तो निर्णय घेण्याची विनंती नितीन गडकरी यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयल यांना पत्र पाठवून केली आहे.
सराफांना हॉलमार्क असलेले सोने विकणे १ जूनपासून बंधनकारकी केले आहे. मात्र केंद्र सरकारकडून अद्यापपर्यंत सोन्याचे दागिने हॉलमार्क प्रमाणित करून देणाऱ्या सेंटरची संख्या वाढविण्यात आलेली नाही. त्यामुळे हॉलमार्क दागिने विकण्याला सरकारने वर्षभर मुदतवाढ द्यावी, अशी मागणी महाराष्ट्रातील सराफ संघटनांनी तसेच ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक यांनी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. त्या संदर्भात गडकरी यांनी याबाबत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयल यांना पत्र पाठविले आहे.