मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता मुकेश अंबानी यांनी महिला सबलीकरणाच्या उद्देशाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘हर सर्कल’ सुरू केले. यासंदर्भात त्यांनी एक प्रसिद्धिपत्रक दिले असून, त्यामध्ये म्हटले आहे की, खास महिला संबंधित गोष्टींसाठी हर सर्कल तयार केले गेले आहे. महिलांचे सबलीकरण आणि जागतिक स्तरावर महिलांच्या उन्नतीसाठी काम करणे या प्रकारचा हा पहिला डिजिटल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे. प्लॅटफॉर्म महिलांचा सहभाग, नेटवर्किंग आणि परस्पर समर्थन यासाठी ‘हर सर्कल’ सुरक्षित माध्यम प्रदान करेल.
महिला जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवतात, तेव्हा अविश्वसनीय गोष्टी घडतात. मी आयुष्यभर ज्या महिलांच्या सानिध्यात वाढले त्यांनी मला दया, लवचिकता आणि सकारात्मकता शिकवली आहे आणि त्या बदल्यात मी इतरांनाही तेच शिकवण्याचा प्रयत्न केला. मी ज्या ११ मुलींच्या कुटुंबात वाढले, तिथे मला स्वतःवर विश्वास ठेवण्यास शिकवले गेले. असे सांगत नीता अंबानी म्हणाल्या की, कोट्यवधी महिलांचे समर्थन आणि एकता आम्ही हर सर्कलच्या माध्यमातून वृद्धिंगत करू शकतो. सर्व संस्कृती, समुदाय आणि देशाच्या महिलांच्या कल्पना तसेच उपक्रमांचे 24×7 ग्लोबल नेटवर्किंग, डिजिटल क्रांती आणि प्रत्येकाच्या मदतीने ‘हर सर्कल’ स्वागत करेल. समानता आणि भगिनीभाव हे त्याचे वैशिष्ट्य असून मला आनंद आहे की, ज्यामध्ये प्रत्येक स्त्रीचे स्वागत होईल.
Her circle हे Google Play Store आणि My Jio App Store वर विनामूल्य उपलब्ध आहे.
Her circle हे केवळ मोबाइलसाठी नाही तर त्याची डेस्कटॉप वेबसाइट आहे. वापरकर्ते विनामूल्य Her Circle नोंदणी करू शकतात. सध्या ही वेबसाइट इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे. नंतर ती इतर भारतीय भाषांमध्येही सादर केली जाणार आहे.