श्रीरामपूर : बहुजननामा ऑनलाईन- बिबट्याच्या हल्ल्यात एका 9 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील कुरणपूर गावात घडली आहे. दर्शन चंद्रकांत देठे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून बुधवारी रात्री ही घटना घडली. अनेक दिवसांपासून श्रीरामपूर परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करावा, अशी अनेक दिवसांपासूनची श्रीरामपूरकरांची मागणी आहे. मात्र त्याकडे वनविभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांनी या घटनेनंतर केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , दर्शन देठे हा जवळच वस्तीवर असलेल्या गणपतीच्या आरतीसाठी गेला होता. गणपतीची आरती झाल्यानंतर दर्शन आपल्या चुलतीसमवेत घरी चालला असता बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप मारून शेजारील असलेल्या उसात पाचशे-सहाशे फूट ओढत नेले. त्याची चुलती अश्विनी देठे हिने आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने त्याला तिथेच टाकून तेथून धूम ठोकली.
बिबट्याच्या हल्ल्यात दर्शन गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत उपचारास नेत असताना त्याचा मृत्यू झाला. शिकारीच्या शोधात असणारे बिबटे वारंवार नागरिकांवर हल्ले करण्याच्या घटना या परिसरात वाढल्या आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.