सातारा : बहुजननामा ऑनलाईन – दोन दिवसांपुर्वी शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टिका केली होती. ते म्हणाले होती की, निवडणुकीनंतर उदयनराजे यांचे वागणे बदलले आहे. त्यामुळे शिवेंद्रराजेंना उदयनराजे भोसले काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र लोकसभेला आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी आमचे कामच केले असल्याने, आमच्या दिलेल्या शब्दात फरक पडणार नाही, असे म्हणत उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना विधासभेसाठी पाठबळ दिले आहे.
सातारा जिल्हातील राष्ट्रवादीतील अंतर्गत धुसपुस रामराजे निंबाळकर व उदयनराजे यांच्या भांडणातून समोर आली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत उदयनराजे काय भुमिका घेणार याविषयी उलटसुलट चर्चा सुरु होत्या.या सर्व चर्चांना प्रसिद्धीपत्रकाव्दारे उदयनराजेंनी पुर्ण विराम दिला आहे.
शिवेंद्रराजे भोसले यांना सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघात आमचे पाठबळ राहील. त्या भूमिकेत बदल होणार नाही. तथापि, त्यांच्या करणीमुळे काही बरे-वाईट घडल्यास सर्वस्वी तेच जबाबदार असतील. ‘रोग रेडयाला आणि इलाज पखालीला’ असला त्यांचा सुरु असलेला प्रकार त्यांनी बंद करावा. स्वतःच निर्माण केलेल्या बागुलबुवांना स्वतःच निपटावे, आमच्यावर तर नाहीच नाही परंतु दुसऱ्या कोणावरही अगोदरच (प्री-मॅच्युरिटी) खापर फोडू नये,’ असा इशारा देखील उदयनराजे भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिला आहे.