‘तो’ प्रकार उघडकीस आल्याने साई संस्थान अलर्ट
शिर्डी : बहुजननामा ऑनलाइन – सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या एका घटनेमुळे शिर्डीमध्ये आता खबरदारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांबरोबर असणाऱ्या एक वर्षाखालील बालकांची रजिस्टरमध्ये नोंद करण्याचा निर्णय साई संस्थानने घेतला आहे.
नुकतीच एक सहा महिन्यांची मुलगी शिर्डीतील साई मंदिरातील गुरुस्थान येथे दानपेटीजवळ सापडली होती. साई संस्थानाचे सीसीटीव्ही फुटेज यावेळी तपासले असता तिला तिची आईच बेवारस सोडून गेल्याचे उघडकीस आले होते. साई संस्थानाने या घटनेचा बोध घेत यापुढे मंदिरात प्रवेशावेळी पालकांना रजिस्टरमध्ये एका वर्षाखालील बालकांची नोंदणी करावी लागणार आहे. हा निर्णय १ जूनपासून लागू करण्यात आला आहे.
शुक्रवारी ३१ मे सकाळी सहा वाजताच्या दरम्यान एक महिला शिर्डी साईबाबा मंदिरात दर्शन घेण्यासाठी आली होती. एक लहान मुलगी तिच्या हातात होती. मुलीसह साई मंदिराच्या गेट क्रमांक ४ मधून या महिलेने प्रवेश केला. ही महिला प्रवेश केल्यानंतर मुलीसह गुरुस्थान मंदिराच्या दानपेटीजवळ पोहोचली. त्या महिलेने गर्दीचा फायदा घेत मुलीला तिथेच सोडले आणि गेट क्रमांक ३ वरुन ती बाहेर पडली. दरम्यान सीसीटीव्ही कॅमेर्यात हा सर्व प्रकार कैद झाला.