मालेगाव : बहुजननामा ऑनलाईन – गिसाका येथील आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीला लाभ पोहोचविण्यासाठी सरकार कागदपत्रांमध्ये फेरफार करून फसवणूक केल्याप्रकऱणी दाभाडी येथील तलाठी व कंपनीचे संचालक समीर भुजबळ यांच्याविरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
शिवाजी सीताराम पाटील (वय ४८) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तलाठी पी. पी. मोरे आणि कंपनीचे संचालक समीर भुजबळ यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाभाडी येथील शिवारात गट नं १२०/७१९ ही शिवाजी पाटील यांचीआई निंबाबाई सीताराम पाटील यांच्या नावावर वडिलोपार्जित जमीन आहे. दाभाडीचे तलाठी पी. पी. मोरे यांनी आर्मस्ट्रॉंग कंपनीच्या हितासाठी शेत गट क्र. १२०/७१९ ही शेतजमीन च्या सातबाऱ्याच्या उताऱ्यावर जुलै २०१४ मध्ये एकाच महिन्यात पडित व पीकपेरा असा वेगवेगळा शेरा मारला. त्यानंतर तो अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला. तलाठ्याने आर्थिक फायद्यासाठी अधिकाराचा गैरवापर करून सरकारी कागदपत्रात फेरफार केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.
महसूल विभागाने याप्रकरणी चौकशी केल्यावर मोरे यांच्यावर दोष सिद्ध झाला. तर न्यायालयीन प्रक्रियेनंतर सीआरपीसी १५३ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जी. के. आखाडे करत आहेत.