New Year Celebrations Pune | ‘थर्टी फर्स्ट’ च्या सेलिब्रेशनवर प्रशासनाची करडी नजर; पुण्यातील विविध भागात यंत्रणा तैनात असणार

December 23, 2024

पुणे / पिंपरी: New Year Celebrations Pune | नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वांनाच ‘थर्टी फर्स्ट’ चे वेध लागले आहे. ३१ डिसेंबरला मावळ आणि मुळशी परिसरातील हॉटेल व रिसॉर्टमध्ये पार्ट्या होत असतात. दरम्यान या पार्ट्यांवर आता पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर असणार आहे. एफडीए चे १५ अधिकारी तैनात असणार आहेत. ग्रामीण भागात पार्ट्यांना रात्री १२ पर्यंत परवानगी असणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात हिंजवडी, रावेतसह लगतच्या परिसरात मोठ्या संख्येने आयटी क्षेत्रात काम करणारी तरुणाई राहते. सध्या सोशल मीडियावर नववर्षाच्या स्वागताच्या तयारीबाबत चर्चा सुरू झाली आहे. तरुणाईकडून रो-हाउस, हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये पार्त्यांचे नियोजन केले जात आहे.

३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहर, उपनगरासह लोणावळा आणि मावळ परिसरातील हॉटेल्स सजली आहेत. मोठ्या पंचतारांकित हॉटेलपासून सध्या हॉटेल्सनाही आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. हिंजवडी, लोणावळा, खंडाळा, पवना बॅकवॉटर, आंदर मावळ आणि पवन मावळ, वडिवळे धरण, कासारसाई, मुळशी धरणाच्या परिसरात रेसॉर्ट, खासगी रो-हाउस, हॉटेलमध्ये पार्ट्या होतात. सार्वजनिक ठिकाणी, मोकळ्या जागेत पार्टी करण्यासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असणार आहे.

दरम्यान ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही हॉटेल चालकांनी डिजे, लाईव्ह गाण्यांचे शो आयोजित केले आहेत. तरुण- तरुणींना विशेष सवलत दिली जात आहे. दोन जणांसाठी १५०० पासून ५ हजार रुपयांपर्यंतचे प्रवेश शुल्क असणार आहे.

लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ म्हणाले, ” पवनानगर भागात दरवर्षी नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या पार्श्वभूमीवर हॉटेल, टेंन्ट मालकांची नुकतीच बैठक घेऊन त्यांना ३१ डिसेंबरला जादा कर्मचारी नेमण्याचे, क्षमतेपेक्षा जादा नागरिकांना प्रवेश न देण्याचे आदेश दिले आहेत, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने तेथे येणाऱ्या प्रत्येकाचे आधार कार्ड क्रमांक, गाडी क्रमांक यांची नोंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.”

अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त सुरेश अन्नपुरे म्हणाले, ” पुणे जिल्ह्यात एफडीएचे १५ अधिकारी असून, हॉटेलची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. कमी दर्जाचे आणि असुरक्षित अन्नपदार्थ आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.”