पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. पूजाने आत्महत्या केली नाही तर ती चक्कर येऊन पडली,असा दावा तिच्यासोबत असणाऱ्या दोन मित्रांनी केला आहे. याबाबत पूजाचे मित्र असलेल्या दोन तरुणांनी पोलिस जबाबात माहिती दिली आहे.
पुणे पोलिसांनी अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांचेही जबाब नोंदवले आहेत. तसेच पूजाच्या आई-वडिलांचे देखील जबाब नोंदवले असून यामधून पोलिसांच्या हाती नवनवी माहिती येत आहे. या प्रकरणाचा उलगडा होईपर्यंत पुणे पोलिस तपास करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्र्यांनी मौन सोडले
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी केली जाणार आहे. यामध्ये जे दोषी असतील त्यांना शिक्षा केली जाईल. परंतु गेल्या काही दिवसांत एखाद्याला आयुष्यातून उठविण्याचे प्रयत्न पाहिले आहेत. यामुळे कोणी दोषी वाचता नये तसेच कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये. यामुळे जे सत्य असेल ते जनतेसमोर येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
बीड जिल्ह्यातील परळी या गावची असलेली पूजा चव्हाण काही दिवसांपूर्वी इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी पुण्यात आली होती. भाऊ आणि मित्रासोबत ती वानवडी येथील हेवन पार्क सोसायटीत रहात होती. सोमवारी (दि.8) तिनं इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर काही दिवसांतच या प्रकरणाशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याचे आरोप झाले. परंतु पूजानं मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.