नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण जग चीनमध्ये उत्पन्न झालेल्या कोरोना व्हायरसशी झुंज देत आहे. यादरम्यान चीनमध्ये शास्त्रज्ञांनी आणखी एका अशा फ्लूच्या जातीचा शोध लावला आहे जी महामारीचे रूप धारण करू शकते. या व्हायरसबाबत नुकतीच माहिती मिळाली आहे आणि तो डुकरामध्ये सापडला आहे. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार तो माणसांनाही संक्रमित करू शकतो.
बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार संशोधकांना शंका आहे की, या नव्या व्हायरसमध्ये अणि आणखी जास्त म्यूटेट होण्याची क्षमता असावी आणि तो सहजपणे एका माणसातून दुसर्या माणसात पसरू शकतो. ही सध्या मोठी समस्या नाही, परंतु यामध्ये मानवाला अतिशय वाईटप्रकारे प्रभावित करण्याची क्षमता आहे. यासाठी यावर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे.
नवा व्हायरस, नवा धोका
संशोधकांनुसार या व्हायरसशी लढण्यासाठी माणसामध्ये अजिबात रोगप्रतिकार शक्ती असणार नाही. जगात शेवटची फ्लू महामारी 2009 मध्ये आली होती. हा स्वाइन फ्लू होता आणि मेक्सिकोमधून त्याची सुरूवात झाली होती. स्वाइन फ्लू तेवढा घातक ठरला नाही जेवढा अंदाज लावण्यात आला होता.
कारण स्वाइन फ्लूचा व्हायरस आणि अगोदरपासून असलेल्या फ्लू व्हायरसमध्ये अनेक समानता होती. स्वाइन फ्लूचा कारक हा व्हायरस A/H1N1pdm09 आता दरवर्षी लागणार्या फ्लू वॅक्सीन अंतर्गत येतो.
चीनमध्ये आता जो फ्लू व्हायरस आढळला आहे, तोसुद्धा स्वाइन फ्लू प्रमाणेच आहे, परंतु यामध्ये काही बदल दिसून आले आहेत. या व्हायरसमुळे सध्या धोका नसला, तरी प्रोफेसर किन चाउ चँग आणि त्यांच्या सहकारी जे यावर संशोधन करत आहेत, त्यांचे म्हणणे आहे की, यावर लक्ष ठेवणे जरूरी आहे.
G4 EA H1N1 आहे नव्या व्हायरसचे नाव
संशोधकांनुसार नवा व्हायरस G4 EA H1N1 मध्ये मानवी पेशींच्या आत राहून स्वताला आणखी विकसित करण्याची क्षमता आहे. याचे पुरावेसुद्धा मिळाले आहेत, कारण चीनच्या स्वाइन इंडस्ट्रीमध्ये काम करणार्या काही लोकांमध्ये याची प्राथमिक लक्षणे आढळून आली आहेत.
महत्वाचे हे सुद्धा आहे की, फ्लूच्या सध्याच्या ज्या वॅक्सीन आहेत त्या यावर प्रभावी आणि संरक्षक नाहीत. प्रोफेसर चांग यांच्यानुसार आता जग कोरोना संकटाने व्यापले आहे. परंतु असे असतानाही संभाव्य धोकादायक व्हायरसकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रोफेसर चांग आता यूकेच्या नॉटिंघम युनिव्हर्सिटीत काम करत आहेत.