नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) 2019 पासून शाळकरी मुलांसाठी एक खास कार्यक्रम, युवा वैज्ञानिक कार्यक्रम (युविका) सुरू केला आहे. या कार्यक्रमाचे दुसरे सत्र मे 2020 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा मुख्य हेतू मुलांना अंतराळ तंत्रज्ञान, अंतराळ विज्ञान आणि अंतराळ प्रयोगांची मूलभूत माहिती देणे हा आहे, यामुळे मुलांमध्ये अंतराळातील उपक्रमांबाबत रूची निर्माण होईल. मुलांना अंतराळ विज्ञानाचे विविध उपक्रम आणि बाजू जाणून घेण्यासाठी इस्त्रोने हा युविका हा कार्यक्रम सुरू केला आहे. 8वी पास आणि 9वी मध्ये शिकणारे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा राहणे, खाणे-पिणे आणि येण्या-जाण्याचा खर्च इस्त्रो करणार आहे.
हा कार्यक्रम मेच्या सुट्टीत दोन आठवडे म्हणजे 11 मे ते 22 मे, 2020 असा होणार आहे. या दरम्यान प्रमुख शास्त्रज्ञ आपले अनुभव मुलांना सांगणार आहेत. मुलांना अंतराळ संशोधन केंद्र आणि प्रयोगशाळेत जाण्याची संधी मिळणार आहे. तज्ज्ञांसोबत चर्चा करण्यासाठी एका खास सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. प्रॅक्टिकल आणि फीडबॅक सत्रदेखील आयोजित करण्यात आले आहे. सीबीएसई, आयसीएसई आणि राज्य बोर्डाचे प्रत्येक राज्य, केंद्रशासित प्रदेशातून 3-3 विद्यार्थी निवडण्यात येणार आहेत. देशभरात ओसीआय कँडिडेट्ससाठी 5 अतिरिक्त सीट आरक्षित आहेत. मुळ भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकांसह भारतात शिकणारे विद्यार्थी सुद्धा या कार्यक्रमात भाग घेण्यास पात्र आहेत.
8वी मधील शैक्षणिक प्रगती आणि पाठ्येतर उपक्रमांमधील प्रगतीवर होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खास सवलत देण्यात आली आहे. निवड प्रक्रिया ऑनलाइन नोंदणीच्या माध्यमातून होणार आहे. ऑनलाइन नोंदणी इस्त्रोची वेबसाईट www.isro.gov.in वर 3 फेब्रुवारीपासून करावे लागेल. अहमदाबाद, बेंगळुरु, शिलाँग आणि तिरुअनंतपुरम येथील इस्त्रोच्या चार केंद्रांवर या कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना या चारपैकी कोणत्याही एका ठिकाणी जावे लागेल. इस्त्रोचे गेस्ट हाउस, हॉस्टेलमध्ये राहता येणार आहे. विद्यार्थ्यांचा ट्रेनचा खर्च आणि कोर्ससाठी साहित्य, राहणे आणि खाण्याचा खर्च इस्त्रो करणार आहे. रिपोर्टींग सेंटरपर्यंत विद्यार्थ्यांना पोहचवणे आणि आणण्याची जबाबदारी पालकांची असणार आहे. विद्यार्थ्यासोबत एका पालकाला सेकंड क्लास एसी प्रवासाचे भाडे मिळणार आहे.