अहमदनगरः पोलीसनामा ऑनलाईन – सायबर गुन्हेगारांनी आता ऑनलाइन फसवणूकीसाठी नवीन फंडा शोधल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुंदर तरुणी संपर्कात आली तर अनेकांचे मन विचलित होते, नेमके याच मानसिकतेचा गैरफायदा घेत गुन्हेगारांनी फसवणुकीचा ननीन मार्ग शोधला आहे. तरुणींच्या व्हाॅट्सअॅप व्हिडीओ कॉलमध्ये अडकून नगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक कॉलेज तरुण, व्यावसायिक व विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या लोकांची फसवणूक केल्याचे धक्कादायक बाब समोर आली आहे. अशा फसवणुकीसंदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतरही तांत्रिक अडचणींमुळे या गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे पोलिसांना शक्य होत नाही. त्यामुळे अशा गुन्हेगारांचे फावत आहे.
सायबर गुन्हेगारीमुळे पोलिसांची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा प्रकारच्या फसवणूकीच्या बळी पडलेल्या तीन ते चार तक्रारी आठवड्यातून सध्या येथील सायबर पोलिसात दाखल होत आहेत. सुंदर फोटो असलेली तरुणी प्रथम सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात येते. चॅटिंगच्या माध्यमातून ती मैत्री वाढविते. त्यानंतर ती तरुणी व्हॉट्सअॅपवरून व्हिडीओ कॉल करते. व्हिडीओ कॉल सुरू असतो तेंव्हा ती तरुणी स्क्रीनवर संपूर्ण शरीर दाखवून स्वत:चे कपडे उतरविते. यावेळी समोरील व्यक्तीलाही तसेच करायला सांगते. याच वेळी समोरील तरुणी व तिचे साथीदार स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून नग्न झालेल्या तरुणाचा व्हिडीओ रेकॉर्ड करून घेतात. त्यानंतर त्या व्यक्तीकडे पैशांची मागणी केली जाते. अशा प्रकारे फसवणूक केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
फसवणूक करणा-या टोळ्या परप्रांतीय
व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून ब्लॅकमेल करणाऱ्या टोळ्या या झारखंड, नोयडा, मध्यप्रदेश या परिसरातील असल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिली.
सोशल मिडियावर टार्गेटचा शोध
सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या फसवणुकीसाठी सोशल मीडियावर टार्गेटचा शोध घेतात. प्रथम फेसबुकवरून अकाउंटधारकाला अनोळखी तरुणीची फ्रेण्डरिक्वेस्ट येते. ही रिक्वेस्ट स्वीकारली की, ती मेसेंजरच्या माध्यमातून संपर्कात येते. कधी चॅटिंग तर कधी मेसेंजरच्या माध्यमातून कॉल असा सिलसिला सुरू होतो. नंतर ती व्हाॅट्सअॅप नंबर मागते. त्यानंतर व्हाॅट्सअॅपवरून कॉल करून अडकविले जाते.
अज्ञात व्यक्तीची फ्रेण्डरिक्वेस्ट स्वीकारू नकाः – प्रतीक कोळी, पोलीस उपनिरीक्षक सायबर पोलीस ठाणे, अहमदनगर जर आपल्याला फेसबुकवर अनोळखी व्यक्तीची फ्रेण्डरिक्वेस्ट आली तर ती स्वीकारू नये. प्रत्येकाने आपले फेसबुक अकाउंट प्रायव्हेट करावे. अनोळखी व्यक्तीने संपर्क केला तर त्याला आपली कुठल्याच प्रकारची वैयक्तिक माहिती देऊ नये.