नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वाळूच्या उपशासाठी खोदकाम करताना आंध्र प्रदेशमधील नेल्लोर येथेही एक पुरातन शिवमंदीर पुरातन अवशेष सापडले आहेत. ओडिशामधील महानदीमध्ये काही दिवसांपूर्वीच एक 500 वर्ष जुने मंदिर आढळून आले होते.
नेल्लोमधील पेन्ना नदीच्या पात्रामध्ये मंगळवारी वाळूचा उपसा सुरु असताना एक मंदिरासारखे बांधकाम आढळून आले आहे. वेन्ना नदीच्या काठावर असणार्या पेरुमल्लापडू गावामध्ये वाळूचा उपसा सुरु होता. त्याचवेळी वाळूच्या ढिगार्यामध्ये मंदिराचा कळस आणि प्रवेशद्वारासारखे बांधकाम आढळून आले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे 200 वर्षांपूर्वीचे शिवमंदीर आहे. ओडिशामधील महानदीच्या मुख्य पात्रामध्ये काही दिवसांपूर्वी एक मंदिर आढळून आले होते.
अनेक वर्षांमध्ये नदीचा प्रवाह बदलल्याने हे मंदिर पाण्याखाली गेल्याचे सांगण्यात येत आहे. इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अॅण्ड कल्चर हेरिटेजच्या (आयएनटीएसीएच) सर्वेक्षणादरम्यान हे मंदिर आढळून आले आहे. नयाघर येथील बहापूरमधील पदमाबती गावात नदी पात्रात हे मंदिर संशोधकांना अगदी नदीपात्राच्या मध्यभागी दिसून आले आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांच्या माहितीनुसार 60 फूटांचे हे मंदिर गोपीनाथ देवाचे आहे. गोपीनाथ हा भगवान विष्णूचा अवतार असून 15 व्या आणि 16 व्या शतकाच्या सुरुवातील या मंदिराचा कळस बांधण्यात आल्याचे प्राथमिक पहाणीमधून दिसून येत असल्याचे पुरातत्वशास्त्रज्ञचे म्हणणे आहे.