बहुजननामा ऑनलाईन
सध्याचा जमाना हा ऑनलाईनचा आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाइन खरेदी-विक्रीवर अनेकजण भर देत आहेत. सर्व बिले ऑनलाईनच भरली जात आहेत. कॅशलेश व्यवहारांना अधिक पसंती दिली जाते. त्यामुळेच भारतात डिजिटल पेमेंट पद्धतीने व्यवहार करण्यास प्राधान्य दिले जात आहे. मात्र, ऑनलाईन व्यवहार करत असताना किंवा डिजिटल पेमेंट करत असताना अनेक वेळा फसवणूक होण्याची शक्यता असते. आपला ओटीपी, पासवर्ड कोणालाही सांगू नका असे मेसेज हे बँकेकडुन सातत्याने ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी येत असतात. तरी देखील फ्रॉड करणारे नवनवीन शक्कल लढवून लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
इंटरनेट बँकिंग नाही, पेटीएम अकाऊंट नाही, बँकेकडुन कोणताही मेसेज अथवा ओटीपी आला नाही तरीही अकाऊंट मधून पैसे कट झाल्याच्या अनेक घटना या सध्या समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा फ्रॉडपासून सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. अशा परिस्थितीत एक घटना मुंबईमध्ये घडली आहे. शहाब शेख यांचे येस बँकेत खाते आहे. त्यांना बँकेचा फोन आला आणि तुमच्या पेटीएम अकाऊंट मधून पैसे ट्रान्सफर झाल्याचं सांगण्यात आलं. हे ऐकून शेख यांना धक्काच बसला. कारण त्यांचे पेटीएम अकाऊंट नाही आणि ते इंटरनेट बँकिंगचा देखील वापर करत नाहीत. तसेच त्यांना या संदर्भात कोणताही मेसेज आला नाही.
11 जुलै ते 16 जुलै या कालावधीत तब्बल 11 वेळा पेटीएमच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवण्यात आले. आतापर्यंत एकूण 42 हजार 368 रुपये पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ही बाब लक्षात येताच त्यांनी बँकेकडे चौकशी केली. तेव्हा बँकेने त्यांना तुमचीच चूक असल्याच सांगितले. तसेच कोणाला तरी तुम्ही तुमचे बँकेच्या अकाऊंट संबंधित तपशील दिल्याचं देखील सांगितलं आहे. शेख यांनी याप्रकरणी पोलिसांत धाव घेतली असून तक्रार दाखल केली आहे.
ऑनलाईन फसवणूकीपासून असा करा बचाव
सध्याच्या काळात अशा प्रकारच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे आरबीआय नेहमी वेळोवेळी सावधगिरी बाळगते तसेच इंटरनेट बँकिंग किंवा मोबाइल बँकिंग वापरताना मोठी काळजी घेतली पाहिजे असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
– कोणालाही कधीही क्रेडिट किंवा डेबिट कार्ड तपशील देऊ नका.
– सार्वजनिक वाय-फाय किंवा इंटरनेट नेटवर्कद्वारे कधीही बँकिंग व्यवहार करु नका.
– बँकिंग खाते नेहमी मोबाईल नंबरसह अपडेट करा आणि डेबिट कार्डचा सीव्हीव्ही, नंबर किंवा पिन सारख्या गोष्टींचा तपशील मोबाईलमध्ये ठेवू नका.
– आपण पेमेंट अॅप वापरत असल्यास, सावधगिरी बाळगा, पेमेंट अॅपला जास्त अधिकार देऊ नका.
– ऑनलाईन व्यवहारासाठी वेगळं अकाऊंट ठेवणं चांगलं आणि त्यामध्ये चार किंवा पाच हजारांपेक्षा जास्त रोख रक्कम ठेवू नये. आपले मुख्य बँक खातं इंटरनेटशी जोडू नका.