सातारा : बहुजननामा ऑनलाईन- राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हेदेखील राष्ट्रवादीतून बाहेर पडणार असल्याची माहिती आहे. साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्यानंतर आता साताऱ्यात राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. वजनदार नेते म्हणून रामराजे नाईक निंबाळकर ओळखले जातात. रामराजेंच्या उपस्थितत आज कार्यकर्त्यांचा मेळावा होणार असून यात ते शिवसेना प्रवेशाची घोषणा करण्याची शक्यता आहे.
का देताहेत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी ?
रामराजे आणि उदयनराजे यांच्यातील संघर्ष हा सर्वपरिचित आहे. आगामी विधानसभा निवडणूक जवळ येत आहेत. अशात हा संघर्ष टोकाला गेल्याचे दिसत आहे. रामराजेंनी याच संघर्षामुळे राष्ट्रवादीला निर्वाणीचा इशारा दिला होता. एकाच वेळेस दोन्ही राजे सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत दाखल होताना दिसत आहेत.
परंतु राष्ट्रवादी सोडण्यामागचे नेमके कारण समोर आलेले नाही. याचे काही कारण त्यांच्यातील संघर्ष आहे की दुसरेच काही याबाबत चर्चा रंगताना दिसत आहेत. रामराजे आणि उदयनराजे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी करत प्रयत्न केले होते. परंतु त्यांना यश आले नाही. उलट पवारांच्या बैठकीनंतरच दोघांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवली होती.