बहुजननामा ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पदमसिंह पाटील यांचे चिरंजीव आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील हे भाजपमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राणाजगजितसिंह पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याचीही चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. राणा जगजितसिंह पाटील यांना राष्ट्रवादीनं उस्मानाबाद मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली होती. पण निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर काही दिवसांतच ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू झाली होती.
बकरी ईदच्या शुभेच्छा देताना शेअर केलेल्या फोटोवर राणा पाटील यांनी आमदारपदाचा उल्लेख टाळला आहे. या कारणामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याच्या चर्चां सगळीकडे पसरत आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीपक्षाला राजीनामा देत सत्ताधारी पक्षाची वाट धरली आहे. यामध्ये अनेक जेष्ठ नेत्यांचा देखील समावेश आहे. जसे की, मधुकर पिचड, सचिन अहिर या बड्या नेत्यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यामुळे राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकीच्या आधी अडचणीत आली आहे.
राष्ट्रवादी सोडलेल्या नेत्यांच्या मतदारसंघात सत्ताधारी पक्षाचाच असंतुष्ट नेता गळाला लागतो का, याची राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून चाचपणी सुरू झाल्याची माहिती आहे. तसंच मतदारसंघात तरूण नेत्यांना बळ देऊन पक्षांतर केलेल्या नेत्यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी विशेष मेहनत घेणार असल्याची माहिती आहे.