बारामती : बहुजननामा ओनलाईन – मराठा समाजाला ‘सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास’ (एसबीईसी) या श्रेणीत राज्य सरकारने दिलेले आरक्षण मुंबई उच्च न्यायालयानेही वैध ठरवले त्यांनतर आता अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या धनगर आरक्षणाचा प्रश्न पुढे येऊ लागला आहे. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी धनगर आरक्षणाबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे. बारामतीतील एका आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त बारामतीत येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अमोल कोल्हे म्हणाले की, ‘आरक्षणाच्या लढ्यात मी तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत आहे.” आरक्षणाचे यश हे तळागाळापर्यंत म्हणजेच आपल्या बांधवांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे. ही जबाबदारी आपली आहे आणि या आरक्षाणाच्या लढ्यात खांद्याला खांदा लावून मी तुमच्यासोबत आहे असेही यावेळी कोल्हे म्हणाले.
दरम्यान, बारामती शहरात दरवर्षी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते पाटील हे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती भव्य दिव्य स्वरुपात साजरी करतात. यावेळी झालेल्या जयंती उत्सवासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे, आमदार रामराव वडकुते हे मंचावर उपस्थित होते.