मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाबाबत एक नवा फॉर्म्युला समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीला सर्वाधिक १६ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये उपमुख्यमंत्रिपदाचा समावेश असणार आहे. तसंच गृहमंत्रिपदासाठीही राष्ट्रवादी आग्रही आहे. तर शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रिपदासह १५ मंत्रिपदे येतील. यामध्ये ११ कॅबिनेट तर ३ राज्यमंत्रिपदांचा समावेश असेल. तर तिसऱ्या नंबरला असणाऱ्या काँग्रेसला १२ मंत्रिपदे मिळतील, अशी माहिती आहे. यामध्ये ९ कॅबिनेट तर ३ राज्यमंत्रिपद काँग्रेसच्या वाट्याला येऊ शकतात. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे राहणार असले तरीही खरी पॉवर राष्ट्रवादीकडेच राहील असं चित्र आहे.
महाआघाडीचे सरकार स्थापण्यासाठी निर्णायक भूमिका बजावलेल्या राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद नसले तरी महत्वाची व सर्वाधिक खाती असतील अशी शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळणार असून, त्याबाबतचा निर्णय नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपुष्टात आल्यानंतर म्हणजे २२ डिसेंबरनंतर पक्षश्रेष्ठी घेतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी दिली आहे. २००४ मध्येही राष्ट्रवादीने सत्तावाटपाचा हाच फॉर्म्युला वापरला होता. २००४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा जास्त जाागा मिळाल्या होत्या.
मात्र तरीही राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे देऊन उपमुख्यमंत्रिपदासह गृहमंत्री, अर्थमंत्री अशी अनेक महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली होती. राष्ट्रवादीतून उपमुख्यमंत्रिपदासाठी अनेक नेते इच्छुक आहे. मात्र उपमुख्यमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे जाणार असल्याची माहिती आहे. कारण राष्ट्रवादीत अजित पवार यांचा समर्थक मोठा गट आहे. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद मिळावं, यासाठी त्यांच्या समर्थकांचा पक्षावर दबाव आहे. त्यामुळे सरकारला स्थिरता आणण्यासाठी राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
Visit : bahujannama.com