बहुजननामा ऑनलाईन टीम : राज्यात महाविकासआघाडीच सरकार येणार यावर अंतिम शिक्कामोर्तब होत असताना रात्रीतून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षाविरुद्ध बंड करत भाजपला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार होते. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला, मात्र अजित पवार यांनी पदभार न स्वीकारताच घरी परतले .
अजित पवार विधानभवनात पोहोचल्यानंतर राष्ट्रवादीचे दिग्गज नेतेही तिथे दाखल झाले. अजित पवार यांची मनधरणी करण्यासाठी हे नेते तेथे उपस्थित झाले होते. त्यानंतर अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये तब्बल ४ तास बैठक झाली. ही बैठक संपताच अजित पवार यांनी पदभार न स्वीकारता घरी जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीत येणार का ? अशी चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवारांची समजूत काढण्यासाठी गेलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सांगितले कि, ‘अजित पवार परत यावेत, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. त्यासाठी सकारात्मक चर्चा करण्याचा प्रयत्न होता.
दरम्यान, अजित पवार यांची समजूत काढण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि रामराजे निंबाळकर हे नेतेदेखील या बैठकीत उपस्थित दर्शविली होती. या नेत्यांमध्ये जवळपास ४ तास बैठक झाली.