नवी दिल्ली : वृत्तसंस्था –
बाहेर देशाच्या प्रवासासाठी पासपोर्ट हे लागतेच. तसेच पासपोर्टचा एक महत्त्वाचे ओळखपत्र म्हणून देखील वापर केला जातो. मात्र आता तुमच्या पासपोर्टवर कमळाचे चिन्ह दिसणार आहे. केरळच्या कोझिकोड येथे कमळाचे चिन्ह असलेल्या पासपोर्टचे वाटप करण्यात आले. यानंतर थेट संसदेत हा मुद्दा गाजला. भाजपचे निवडणुक चिन्ह असलेल्या कमळाचा वापर पासपोर्टवर करण्यात आल्यामुळं विरोधकांनी जोरदार टीका केली. विरोधांची आक्रमकता पाहून लगेच परराष्ट्र मंत्रालयानं तातडीनं याबाबत खुलासा केला आहे.
याप्रकरणी संसदेत विरोधीपक्षांनी आवाज उठवल्यानंतर, कमळ हे राष्ट्रीय फुल असून ते देशाचे प्रतिक आहे, तसेच सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याची सारवासारव परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. काँग्रेसचे खासदार एम. के. राघवन यांनी कमळाचे चिन्ह असलेल्या पासपोर्टचे केरळात वाटप झाल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी वृत्तपत्रांनी याबाबत माहिती दिल्याचे सांगत, सरकारी संस्थांचे भगवेकरण करण्याचा भाजपने घाट घातल्याची टीका राघवन यांनी केली.
संसदेत काही मुद्दे उपस्थित झाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयानं गंभीर दखल घेत प्रवक्ते रवीश कुमार यांनी लगेचच याबाबत स्पष्टीकरण दिले. रवीश कुमार यांनी, “हे चिन्ह आमचे राष्ट्रीय फुल आहे आणि बनावट पासपोर्ट शोधण्यासाठी आणलेल्या अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांपैकी हा एक भाग आहे.” तसेच, आंतरराष्ट्रीय नागरिक उड्डाण संघटनेच्या आदेशानंतरच सेक्युरिटी फिचर्स छापलं जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच, कमळाच्या चिन्हाशिवाय इतर राष्ट्रीय प्रतीकांचादेखील यापुढे वापर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.