नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. २००८ मध्ये इगतपुरीत मनसे कार्यकर्त्यांनी परप्रांतीयाच्या हॉटेलची केलेली तोडफोड तसेच मारहाण प्रकरणी इगतपुरी न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणी इगतपुरी न्यायालयाने कोणताही पुरावा न मिळाल्याने राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
परप्रांतीय उमेदवारांना रेल्वेमध्येप्राधान्य दिले जात असल्याच्या कारणावरुन मनसेने २००८ मध्ये राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलन केलं होतं. या प्रकरणात राज ठाकरे यांना मुंबईत अटकही झाली होती. अटकेच्या निषेधार्थ इगतपुरी येथील मुंबई आग्रा-महामार्गावर असलेल्या एका परप्रांतीय हॉटेलवर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. राज ठाकरे यांच्या चिथावणीनंतर हे आंदोलन झाल्याचा आरोप होता.
या प्रकरणी, इगतपुरी न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरु होती. यामधील सहा संशयितांची यापूर्वीच निर्दोष मुक्तता केली होती, मात्र पक्षप्रमुख म्हणून राज ठाकरे यांचं नाव या खटल्यात होतं. १८ डिसेंबर २०१८ रोजी राज ठाकरे इगतपुरी न्यायालयात उपस्थित राहिले होते. त्यावेळी न्यायालयाने राज ठाकरेंना जामीन मंजूर केला होता. मात्र या प्रकरणात कुठलाही पुरावा न मिळाल्याने राज यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.