बहुजननामा ऑनलाइन टीम – फेब्रुवारीत लग्नाची तारीख ठरली होती. मात्र बोहल्यावर चढण्याचे स्वप्न बघणा-या तरुणावर काळाने घाला घातला. भरधाव टॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच( young man dies ) मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. नांदगाव – मनमाड रस्त्यावर हिसवळ बुद्रुक वळणावर हा अपघात झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान याच रस्त्यावर टँकरच्या धडकेत गेल्या 17 दिवसांत दोघांना जीव गमवावा लागला असून, तीन जणांना अपंगत्व आले आहे.
जनार्दन सावळीराम वाघीरे (22, रा.डॉक्टरवाडी, ता नांदगांव) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अंकुश भागीनाथ डोळे (25 जतपुरा ता.नांदगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. मृत जनार्दनचे फेब्रुवारी महिन्यात लग्न ठरले होते. त्याच्या घरी लग्नाची तयारी सुरु होती.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून जनार्दन वाघीरे आणि अंकुश डोळे हे दोघे मावसभाऊ सर्पदंशाने मयत झालेल्या काकांच्या दशक्रियेला डॉक्टरवाडी येथे गेले होते. दशक्रिया विधी आटोपून ते दोघे निफाड साखर कारखान्यावर कामाला जायला निघाले. मात्र नांदगाव – मनमाड रस्त्यावर हिसवळ बुद्रुक वळणावरुन जात असतांनाच टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात जनार्दन हा जागीच ठार झाला, तर अंकुश गंभीर जखमी झाला. जनार्दनवर शुक्रवारी (दि. 8) रात्री उशिरा त्याच्यावर डॉक्टरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.