बहुजननामा ऑनलाइन टीम – नुकतीच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आगामी ९४ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ठिकाण नाशिक निश्चित झाल्याची घोषणा झाली. ते कधी होणार याबाबत उत्सुकता लागली होती, अखेर आता या संमेलनाची तारीखही निश्चित करण्यात आली आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस नाशिक येथे हे संमेलन होणार आहे. याची तारीख २६, २७ व २८ मार्च २०२१ अशी निश्चित करण्य़ात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ प्रतिनिधी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिककरांशी चर्चा करून संमेलनाच्या तारखा निश्चित केल्या जातील, त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीनं त्यानंतर या संस्थेला भेट दिली. समितीच्या सदस्यांनी जागेची पाहणी करून आपला अहवाल महामंडळाला दिला होता. त्यावर विचारविनिमय झाल्यानंतर स्थळ नाशिकमध्ये निश्चितीची घोषणा करण्यात आली. ९४ व्या साहित्य संमेलनासाठी नाशिकमधून दोन, सेलू येथून एक, पुण्यातून (दिल्लीसाठी)) एक आणि अंमळनेरमधून एक अशी पाच आमंत्रणे आली होती. पुण्याच्या ‘सरहद्द’ संस्थेनं फेर निमंत्रण पाठवलं होतं. त्यात मे महिन्यात दिल्लीत संमेलन घेण्याची मागणी केली होती. मात्र, महामंडळाने नाशिकमधील लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारले होते.