नाशिक/देवळा : बहुजननामा ऑनलाइन – एसटी बस आणि रिक्षाची समोरा समोर भीषण धडक होऊन दोन्ही वाहने एका विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. अपघातग्रस्त बस ही कळवण आगाराची आहे. दोन्ही वाहने विहिरीत कोसळल्याने मोठ्याप्रमाणात जिवितहानी झाल्याचे वृत्त आहे. अपघातानंतर जखमींना नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले.
मेशी फाटा जवळील एका वळणावर दोन्ही वाहने वेगात असताना हा अपघात झाला. वाहनांच्या वेगावर नियंत्रण न करता आल्याने एसटी बस आणि रिक्षाची समोरा समोर जोरदार धडक झाली. यानंतर बसने रिक्षाला काही अंतर फरफटत नेले आणि दोन्ही वाहने एका विहीरीत कोसळली. विहिरीत रिक्षावर बस पडल्याने रिक्षामधील सात ते आठ प्रवाशी आणि बसमधील तीन प्रवाशी जागीच ठार झाल्याचे वृत्त आहे.
अपघातानंतर शर्थीचे प्रयत्न करून जखमींना बाहेर काढण्यात आले. जखमींना उपचारासाठी येथील ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले आहे. नाशिक येथील जिल्हा रूग्णालयही सज्ज करण्यात आले असून जिल्हा शल्य चिकित्सक तातडीने घटनास्थळी रवाना झाले होते. नाशिकहून जिल्हा रूग्णालयाच्या पाच गाड्या रवाना झाल्या होत्या.