नाशिक : बहुजननामा ऑनलाइन – नाशिकमध्ये एका १४ महिन्याच्या मुलीच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. हा मृत्यू नाही तर घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकार शहरातील औरंगाबाद महामार्गावरील पॅराडाईज अपर्टमेंटमध्ये घडला आहे. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी सुरु केली असून मुलीची आई परस्परविरोधी माहिती देत असल्याने संशय बळावला आहे.
पॅराडाईज अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मुकेश पवार यांच्या १४ महिन्यांच्या स्वराला जखमी अवस्थेत पंचवटीतील निमाणी परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी स्वराला तपासून मृत घोषीत केले. मुलीची आई योगिता ही देखील जखमी असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा प्रकार घडला त्यावेळी मुलगी आणि आई घरामध्ये होते तर वडील कामावर गेले होते. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आई परस्परविरोधी माहिती देत असल्याने संशय बळावला असून आईच्या हातावरच्या खुना या किरकोळ असल्याचेही पोलिसांनी सांगितले. त्यामुळे नेमकं काय झालं याचा पोलीस तपास करत आहेत.
या घटनेबाबत स्वराच्या आई-वडीलांना पोलिसांना अद्याप कोणतीच माहिती दिलेली नाही. स्वराच्या गळ्यावर जखमा असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. या जखमांमुळेच तिचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. नेमके काय घडले हे अद्याप समजू शकले नसून, सर्व शक्यता गृहित धरून तपास सुरु केला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.