Narsayya Adam Mastar | माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांचा गौप्यस्फोट; म्हणाले – ‘लोकसभा निवडणुकीत शिंदेंकडून मला पैशाची ऑफर होती’
पुणे: Narsayya Adam Mastar | काँग्रेसने सोलापूर मध्य मतदारसंघातून उमेदवार मागे घ्यावा, हा मतदारसंघ माकपला सुटावा, हा मतदारसंघ माकपला न सुटल्यास खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्याविषयी मोठा गौप्यस्फोट करू. त्यात काँग्रेस पक्षाच्या चिंधड्या चिंधड्या उठतील,असा इशारा माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी दिला होता.
त्यानंतर आता आडम मास्तर यांनी प्रणिती शिंदेंबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या सांगण्यावरून काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि त्यांचे सहकारी हे दोन वेळा माझ्या घरी आले होते.
सुशीलकुमार शिंदे हे तुम्हाला लाखो रुपये द्यायला तयार आहेत, ते आपण स्वीकारावेत, अशी दोन वेळा विनंती केली. तसेच, तिसऱ्यांदा २५ लाख रुपये घेऊन दत्ता सुरवसे आणि बेसकर आले होते, असा गौप्यस्फोट मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी केला आहे.
दरम्यान, सोलापूर शहर मध्य मतदारसंघ नरसय्या आडम मास्तरांना सोडला तर सोलापूर शहरावरील आपला ताबा जाईल, अशी भीती शिंदे कुटुंबीयांना वाटते. विशेषतः प्रणिती शिंदे यांनी आमचा केसाने गळा कापला आहे. आमची अडचण होत असेल, त्यामुळेच त्यांनी माझा गेम केला आहे, असा आरोपही आडम मास्तर यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर केला.
माजी आमदार नरसय्या आडम म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत मतदानाला पाच दिवस असताना बेसकर आणि दत्ता सुरवसे हे सोलापूर शहरातील दत्त नगरमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात आले होते. आम्ही पंचवीस लाख रुपये आणले आहेत, ते तुम्ही स्वीकारा, अशी ऑफर त्यांनी दिली. मात्र, आमचा क्रांतीकारक बाणा असल्यामुळे एक रुपयाही न स्वीकारता लोकसभा निवडणुकीत माकपच्या कार्यकर्त्यांनी प्रणिती शिंदे यांचे काम केले”, असे नरसय्या आडम मास्तर यांनी म्हंटले आहे.
Comments are closed.