Narhari Zirwal On Dhangar-Dhangad GR | ‘धनगर-धनगड’ च्या जीआरला विधानसभा उपाध्यक्षांचा विरोध; आरक्षणावरून महायुतीतच कलगीतुरा रंगला

Narhari Zirwal-Eknath Shinde

मुंबई : Narhari Zirwal On Dhangar-Dhangad GR | राज्यात आरक्षणाच्या प्रश्नावरून सरकारला कोंडीत धरले जात आहे. दरम्यान आता मराठा आरक्षणाला घेऊन महायुती सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. तर धनगर आरक्षणाबाबतची राज्य सरकारने (Mahayuti Govt) मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. मात्र या निर्णयावर महायुतीत मतभेद असल्याचे पाहायला मिळतेय.

राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी याबाबत माहिती दिली आहे. मात्र याला महायुतीतूनच विरोध झाल्याने चर्चा सुरु आहेत.

आदिवासींमधून आरक्षण देण्याचा अट्टाहास का? असा सवाल उपस्थित करत विधानसभा उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांनी राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.

नरहरी झिरवळ म्हणाले, वर्षानुवर्षे हा विषय सुरू आहे. धनगर समाजाला आरक्षण द्यावे यावर आमचे दुमत नाही. पण आमच्यातून देऊ नये. माझी सरकारला विनंती आहे की, जसे त्यांना बोलावले जाते तसं आम्हालाही बोलवावे. आमचे नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांना बैठकीला बोलवायला हवं होतं, असे म्हणत त्यांनी विरोध दर्शवला आहे.

ते पुढे म्हणाले, मी विधानसभा उपाध्यक्ष असल्याने समाजाचे माझ्याकडे लक्ष आहे. आदिवासींच्या धर्तीवर आरक्षण देऊ असे म्हटले होते. पण आदिवासींमधूनच आरक्षण देण्याचा अट्टहास का? सरकारच्या निर्णयाविरोधात आदिवासी आमदार, नेते, संघटना सर्व एकत्र येतील.

आम्ही सर्व आदिवासी नेत्यांची बैठक घेऊन पुढील भूमिका स्पष्ट करणार आहोत. विरोध करायचा की न्याय मागायचा? हा निर्णय घेतला जाणार आहे. धनगर आरक्षणाच्या मुद्यांवर आम्ही आजही राजीनाम्यावर ठाम आहोत. आम्ही लवकर पुढची भूमिका स्पष्ट करणार, असे नरहरी झिरवळ यांनी म्हटले आहे.