Nana Patole On Mahayuti Govt | नाना पटोलेंचा राज्यसरकारवर निशाणा ; म्हणाले – “चुकीच्या व्यक्तीच्या हातात राज्याची सुत्रे असल्याने….”

July 8, 2024

मुंबई: Nana Patole On Mahayuti Govt | मुंबई व उपनगरातील परिस्थिती पावसाने भयावह झाली आहे. अनेक भागात पाणी साठले आहे. रेलवे आणि रस्ते वाहतूक सेवा ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. याबाबत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. एकाच पावसात देशाची आर्थिक राजधानी पाण्याखाली जाते हे अतिशय गंभीर आहे. पावसाने शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारचे पितळ उघडे पाडले असून महाभ्रष्ट युती सरकारने ‘चुल्लू भर पाणी मे मुंबई को डुबा दिया’, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

माध्यमांशी बोलतांना पटोले म्हणाले, ” मुंबई महानगर पालिकेचे कारभारी स्वतः मुख्यमंत्री आहेत पण चुकीच्या व्यक्तीच्या हातात राज्याची सुत्रे असल्याने मुंबई व महाराष्ट्राला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. महापालिकेच्या कार्यालयात दोन पालकमंत्र्यांची कार्यालये मुंबईकरांच्या कष्टाचे पैसे खाण्यासाठी काढली आहेत का? असा संतप्त सवाल विचारून स्वतःच्या अपयशाचे खापर मुख्यमंत्री पावसावर फोडत आहेत.

मुंबईत झालेला पाऊस हा काही पहिल्यांदाच झालेला नाही. यापेक्षा मोठा पाऊस मुंबईत झालेला आहे पण आजच्या सारखी बिकट परिस्थिती झाली नव्हती. राजकारणापेक्षा मुंबईच्या कामात जास्त लक्ष घातले असते तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसती, या शब्दांत नाना पटोले यांनी निशाणा साधला.

मुंबईत कोट्यवधी रुपयांचे सिमेंट रस्ते बांधले पण त्यात खड्डे आहेत. कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती लागली, अटल सेतूला भेगा पडल्या, हा महायुतीचा विकास आहे का? महापालिकेने मान्सूनपूर्व कामे केली, नालेसफाई केली असा सरकारचा दावा आहे तो या पावसाने खोटा ठरवला.

मुख्यमंत्री ग्रीन कार्पेटवर उभे राहून नालेसफाईच्या पाहणीचे बिभत्स प्रदर्शन करत होते. त्यांच्या इव्हेंटबाजीचा पर्दाफाश झाला आहे. नालेसफाईत सुद्धा हातसफाई करुन खिसे भरण्याचेच काम झाले म्हणून मुंबई तुंबली. एकाच पावसात विधिमंडळाचे अधिवेशन दिवसभरासाठी तहकूब करावे लागले हे या सरकारचा गलथानपणा व निष्काळजीपणाचे उदाहरण आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मुंबईत पावसाने जनजीवन ठप्प झाले आहे तर दुसरीकडे अनेक भागात दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यावर ओढवले आहे. पाणीटंचाईची अवस्था अत्यंत भयंकर आहे. अनेक गावांत पाण्यासाठी माता भगिणींना पाच पाच किलोमीटर पायपीट करावी लागत आहे.

टँकरमाफिया आणि सरकारी अधिकारी संगनमत करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करत आहेत. जनावरांच्या चा-याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. सरकार फक्त मंत्रालयातून आदेश देते पण प्रशासन खाली काहीच काम करत नाही, याकडे राज्यसरकार कधी लक्ष देणार असे पटोले म्हणाले.