नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – नेतृत्त्वाच्या वादातून नागपुरात हल्ला झालेल्या नामांकित तृतीयपंथीय चमचम गजभिये हिची नुकतीच हत्या करण्यात आली. तिच्या हत्येमुळे तृतीयपंथीयांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. काल (सोमवार) संविधान चौकात तृतीयपंथीय हक्क समिती आणि सारथी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने चमचम हिला श्रद्धांजली देण्यासाठी एका सभेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मोठया, प्रमाणात तृतीयपंथीय, ट्रान्सजेंडर, गे, लेस्बियन व कार्यकर्त्यांनी एकत्र जमत संविधान चौकात कॅन्डल मार्च काढत चमचमला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
झालेल्या घटनेचा तीव्र निषेध करत चमचमच्या मारेकऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा करावी अशी मागणी करत राणी किन्नर यांच्या नेतृत्वात नारे-निदर्शने करण्यात आली. तृतीयपंथीय व ट्रान्सजेंडर समूहाच्या हक्काचे हनन करण्यात येऊ नये, तृतीयपंथीय, ट्रान्सजेंडर, गे, लिस्बियन यांच्याकरिता सुरक्षा समिती गठित करण्यात यावी, आदी विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. चमचम गजभिये हिच्या हत्येमुळे तृतीयपंथीयांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.
याप्रसंगी सारथी ट्रस्टचे आनंद चांदरानी. कुणाल, निकुंज जोशी यांच्यासह इतर पदाधिकारी, ट्रान्सजेंडर, गे, लेस्बियन बहुसंख्येत तृतीयपंथीय उपस्थित होते.