Nagpur Crime News | चोरीच्या गुन्ह्यात अटक असलेला आरोपी रात्रभर पोलीस कोठडीत, दुसऱ्या दिवशी चौकशी दरम्यान चाकू काढला अन्…

January 9, 2025

नागपूर: Nagpur Crime News | चोरीच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीने पोलीस ठाण्यातच पोटात चाकू खुपसून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना (दि.७) जरीपटका पोलिस ठाण्यात घडली आहे. प्रज्ज्वल शेंडे (२२, इंदोरा) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच आरोपीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान पोलिसांनी त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ” प्रज्वल शेंडे हा कुख्यात चोर आहे. त्याच्यावर आतापर्यंत २८ गुन्हे दाखल आहेत. त्याला यापूर्वीही काही गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. सोमवारी रात्री प्रज्वल जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी करण्याच्या तयारीत होता. मात्र, तो गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल शिरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाच्या नजरेत आला. पोलिसांना पाहून तो पळू लागला. पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडून रात्री जरीपटका पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले. जरीपटका पोलिसांनी त्याला रात्रभर पोलीस कोठडीत ठेवले.

त्याला मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याला तपास पथक कक्षात ठेवण्यात आले होते. रागावलेला प्रज्वल एका कोपऱ्यात शांत बसला. मात्र, डीबी टीमचे दोन्ही सदस्य जेवणात व्यस्त असताना त्याने बाजूच्या टेबलच्या ड्रॉवरमधून चाकू काढून पॅन्टच्या खिशात लपवला. काही वेळाने आणखी दोन पोलिस अधिकारी तेथे पोहोचले. त्यांनी प्रज्वलला चोरीची सविस्तर माहिती विचारली. दरम्यान प्रज्वलने चाकू काढला आणि स्वतःचा पोटात वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्या पोटातून रक्तस्त्राव होत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ वरिष्ठांना माहिती देत प्रज्वलला रुग्णालयात दाखल केले.