Nagpur Crime News | ऑपरेशन सिंदूर विरोधात इन्स्टाग्राम अकाऊंटवर आक्षेपार्ह मजकूर; पत्रकाराला अटक; मैत्रिणीलाही पोलिसांनी घेतलं ताब्यात

नागपूर : Nagpur Crime News | जम्मू काश्मिरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले केल्याने तणावाची परिस्थिती आहे. दरम्यान सोशल मीडियावर देशाविरोधात मजकूर लिहिल्याप्रकरणी नागपूर पोलिसांनी एका पत्रकाराला अटक केली आहे. पोलिसांनी संबंधित पत्रकाराच्या मैत्रिणीला देखील ताब्यात घेतलं असून तिची चौकशी केली जात आहे. नागपूरच्या लकडगंज पोलिसांनी ही कारवाई केली.
अधिक माहितीनुसार, माओवाद्यांशी कनेक्शन असल्याच्या कारणातून लकडगंज पोलिसांनी पत्रकाराला अटक केली आहे. रेजाज एम. शीबा सिदीक (एडापल्ली, केरळ) अटक केलेल्या पत्रकाराचे नाव आहे. तर मैत्रिणीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सिदीक हे फ्रीलान्स पत्रकार म्हणून काम करीत आहेत.
सिदीक यांचे माओवादी कनेक्शन असून ते विद्यार्थी चळवळीत सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यांनी स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दहशतवादी हल्ल्यासंदर्भात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला. तसेच भारतीय सैन्यावर देखील आक्षेपार्ह लेखन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी सिदीक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सिदीक यांचा शोध सुरू केला.
दरम्यान, सिदीक दिल्ली येथे गेल्याचे कळाले. त्यानंतर ते दिल्लीहून नागपुरात आले. मैत्रिणीला भेटण्यासाठी ते एका हॉटेलमध्ये थांबले असता पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिसांनी मैत्रिणीला ताब्यात घेतले असून दोघांची कसून चौकशी केली जात आहे. दोघांकडून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे प्रकरण संवेदनशील असल्याचे सांगत पोलीस विभागाकडून गुप्तता बाळगली जात आहे.
Comments are closed.