Murlidhar Mohol | जिल्ह्यातील नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी, छोटे नदी-नाल्यांच्या पाण्यावरही समन्वयाने प्रक्रिया करू – मुरलीधर मोहोळ

Murlidhar Mohol | To make the rivers in the district pollution-free, we will also process the water of small rivers and streams in a coordinated manner - Murlidhar Mohol

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात जिल्हा परिषदेकडून कचरा प्रक्रियासाठी 10 प्रकल्प सुरु होणार

पुणे : Murlidhar Mohol | पुणे जिल्ह्यातील प्रमुख नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांना गती मिळाली असून, या प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी केवळ मोठ्या नद्यांवरच नव्हे, तर त्यात मिळणाऱ्या छोट्या नदी-नाल्यांच्या पाण्यावर देखील प्रक्रिया करण्याची गरज आहे. यासाठी लवकरच पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीत नगरविकास व सामाजिक न्याय विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखरसिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री मोहोळ म्हणाले की, पुणे जिल्हा हा औद्योगिक, शैक्षणिक तसेच माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात देशात अग्रस्थानी असून जलप्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. ग्रामीण व शहरी भागातील गटार व औद्योगिक सांडपाणी थेट नद्यांमध्ये मिसळल्याने पाणी प्रदूषण वाढले आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून प्रकल्प उभारले जात आहेत. परंतु, फक्त प्रमुख नद्यांवरच प्रकल्प उभारून उपयोग होणार नाही, तर उपनद्या, नाले व गटार पाण्यावरही शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया होणे अत्यावश्यक आहे. यासाठी सर्व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व नियोजन प्राधिकरणांनी उत्तम समन्वयासाठी प्रयत्न करावेत.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेकडून 10 नवे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. यामुळे कचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण व स्वच्छता उपक्रमांना चालना मिळून पर्यावरण संतुलन साधण्यास मदत होणार आहे.

पुणे शहरातील रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पुणे मेट्रोचा वाटा वाढत असून जुलै मध्ये एक लाख 92 हजार प्रवासी तर ऑगस्ट मध्ये हा आकडा वाढून 2 लाख 13 हजार प्रवासी असा झाल्याचे पुणे मेट्रो कडून सांगण्यात आले. पुढचा टप्पा दोनचे प्रस्ताव वेगवेगळ्या टप्यावर आहेत. त्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच त्याचे काम सुरु होईल. त्या कामाला अधिक गती देण्याचे निर्देश यावेळी मंत्री श्री. मोहोळ यांनी दिले.

पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मीनलच्या नूतनीकरणाचे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. तसेच नव्या टर्मीनलच्या जागेच्या अधिग्रहणाचे काम सुरु करण्यात आले असून मार्किंगचे काम पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

या बैठकीत जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्ते विकास, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय व कल्याण विभागाच्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विशेषतः केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीत गती आणण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यातील समन्वय वाढविण्याचे निर्देश बैठकीतून देण्यात आले.

जिल्ह्यातील नदी स्वच्छता, शाश्वत कचरा व्यवस्थापन, हरित ऊर्जा निर्मिती, ग्रामीण विकास आणि शहरी भागातील मूलभूत सुविधा या सर्वच क्षेत्रांमध्ये कार्यक्षम व पारदर्शक अंमलबजावणी होणे हीच जिल्हा विकास समितीची प्राथमिकता असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.