Murlidhar Mohol | खासदार मुरलीधर मोहोळ यांचा रविवारी कसब्यात जनता दरबार !
पुणे : Murlidhar Mohol | पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या खासदार जनसंपर्क सेवा अभियानाचा दुसरा टप्पा सुरू असून या दुसऱ्या टप्प्यात दुसरे अभियान कसबा विधानसभा मतदारसंघात रविवारी, दि. २५ मे, २०२५ रोजी सकाळी १० वाजता राबविण्यात येत आहे. शुक्रवार पेठेतील साठे कॉलनीमधील श्री शिवाजी मराठा सोसायटी या ठिकाणी हे अभियान होणार असून यात नागरिकांनी आपल्या समस्या, प्रश्न आणि नव्या कल्पना घेऊन सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ केले आहे.
खासदार म्हणून विजयी झाल्यानंतर मोहोळ यांनी विधानसभा निहाय खासदार जनसंपर्क सेवा अभियान अर्थात जनता दरबार सुरू केले असून या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न, नागरी समस्या, प्रलंबित विषय आणि नव्या कल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अभियानाचा पहिला टप्पा पूर्ण होऊन दुसरा टप्पा सुरू झाला असून कोथरूडनंतर आता कसबा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्याची संधी मिळणार आहे. मोहोळ यांना भेटण्यासाठी सकाळी दहा वाजता प्रत्यक्ष नोंदणी सुरु होणार आहे. तर त्यानंतर टोकन नंबरद्वारे मोहोळ हे थेट नागरिकांना भेटतील. समस्या मांडण्यासोबतच नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहितीही उपलब्ध होणार आहे. शिवाय महापालिका प्रशासन, पोलिस प्रशासन आणि शासनाच्या विविध विभागांचे स्टॉल्स येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘माझ्याकडे केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी असली तरी खासदार या नात्याने पुणेकरांचे प्रश्न समजून घेणे आणि ते सोडविणे हे माझे कर्तव्यच आहे. आजवर झालेल्या ७ अभियानांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून कसबा विधानसभा नागरिकांनीही आपले प्रश्न आणि समस्या घेऊन अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करतो. आजवर आलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात चांगले यश मिळाले आहे. शिवाय या अभियानावर नागरिकांच्या प्रतिक्रियाही समाधानकारक आहेत.’



Comments are closed.