पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – एकतर्फी प्रेम करून तरुणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना भोसरीत घडली आहे. भोसरीतील लांडगेनगर येथे घडली असून शनिवारी सकाळी सव्वानऊ ते अकराच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.
सुमन जयसिंग चौहान (वय-22) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर बरकत खलील अल (वय-20 रा. लांडगेनगर, भोसरी, मुळ रा. जि. मधुबनी, बिहार) याला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. मयत सुमन चौहान हिचा भाऊ रोहित जयसिंग चौहान (वय-24 रा अष्टविनायक गल्ली, भोसरी, मुळ रा जि. इलाहाबाद) याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहित चौहान याची बहीण मयत सुमन ही भोसरीतील लांडगेनगर येथील एका खासगी कंपनीत नोकरी करीत होती. आरोपी बरकत हा सुमन हिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. सुमन शनिवारी कंपनीत काम करत असताना आरोपी बरकत याने घरातील भाजी कापण्याच्या धारदार चाकूने तिच्यावर सपासप वार केले. गळ्यावर वार झाल्याने सुमन गंभीर जखमी झाली.
गळ्यावर वर्मी घाव लागल्याने सुमनचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेनासाठी पाठवून दिला. पोलिसांनी घटनास्थळावरून चाकू जप्त केला असून आरोपी बरकत याला अटक केली आहे. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.