पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – चिंचवड, अजंठानगर येथे शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास एकतर्फी प्रेमातून तरुणाने एका विवाहितेचा चाकूने वार करून खून केला. त्यानंतर स्वतःवरही वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
राणी सतीश लांडगे (29) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. अरविंद शेषराव गाडे (30, दोघेही रा. अजंठानगर, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, राणी आणि अरविंद हे शेजारी राहत होते. दरम्यान, त्यांच्यात ओळख झाली. अरविंद हा राणी यांच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता. याबाबत राणी यांचे पती सतीश यांनी त्याला समजावून सांगितले होते.
अरविंद वारंवार फोन करीत असल्याने राणी यांनी मोबाईल क्रमांक बदलला होता. त्यामुळे चिडलेल्या अरविंद याने शनिवारी राणी यांच्यावर चाकूने वार केले. राणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर अरविंद याने स्वतःवरही वार करून घेतले. तपास चिखली पोलीस करत आहेत.